कोकणगाव विकासासाठी दीड वर्षांत २४७ लक्ष निधी
आमदार अमोल खताळांच्या हस्ते निझर्णेश्वर मंदिर रस्ता व विविध विकासकामांचे लोकार्पण
संगमनेर प्रतिनिधी अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत तालुक्यातील कोकणगावच्या विकासासाठी तब्बल २ ४७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.या निधीतून निझर्णेश्वर देवस्थान परिसरासह संपूर्ण गावाचा विकास होणार असून,एवढ्यावर न थांबता भविष्यातही आणखी निधी उपलब्ध करून परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल.तसेच इतरही विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील कोकणगाव येथे कोल्हार–घोटी राज्य मार्ग ते निझर्णेश्वर मंदिर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते रामभाऊ जोंधळे,गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, भाजप उपजिल्हाप्रमुख सचिन शिंदे,पप्पू गाढे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे,वैद्यकीय सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. संतोष डांगे,दत्तात्रय दिघे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे,बबन पवार, दिलीप वायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक निझर्णेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी येत असतात. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही त्यांच्या अनेक राजकीय व सामाजिक कार्यक्रमांची सुरुवात निझर्णेश्वर महाराजांचे दर्शन घेऊनच करतात. त्यामुळे या देवस्थान परिसराच्या विकासासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत. मात्र, यापूर्वीच्या राजकीय अनास्थेमुळे अनेक विकासकामे रखडली होती. तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतरच या देवस्थान परिसराच्या विकासालाही खरी गती मिळाली आहे.
वनविभागाची जमीन असतानाही आवश्यक परवानग्या घेऊन विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, श्रावण महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करावे.
पुणे–नाशिक रेल्वेमार्ग हा संगमनेर मार्गेच व्हावा, यासाठी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच इतर वरिष्ठ मंत्र्यांसमवेत आपण स्वतःकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असून, हा रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच मंजूर व्हावा यासाठी जोरदार पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले.
मंत्रालय स्तरावर निधी मंजूर करून आणण्यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागतो.त्यामुळे मंजूर झालेल्या प्रत्येक रुपयाचे काम दर्जेदार झालेच पाहिजे. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.मात्र विकासकामांच्या गुणवत्तेवर ग्रामस्थांनीही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीचे सरकार असल्याने विकास कामांना अधिक गती मिळत आहे.
आमदार अमोल खताळ
टायगर सफारीचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे
निझर्णेश्वर मंदिर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी याच भागात टायगर सफारी उभारण्याचा प्रस्ताव वनविभागामार्फत राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे.हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली आहे. ही सफारी उभारल्यास परिसरातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील,असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
