झरेकाठी सोमनाथ डोळे कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,नाविन्यपूर्ण प्रयोग आणि अथक परिश्रमांच्या जोरावर उल्लेखनीय कार्य करणारे संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील प्रगतिशील शेतकरी गणपत बाळासाहेब शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर झाला असून राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,
राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह तसेच कृषी आयुक्त सुरज मांढरे अहिल्यानगर जिल्हा उत्तर भाजपा उपाध्यक्ष सचिन शिंदे,पप्पू गाडे ,यांच्या उपस्थितीत शिंदे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गणपतराव शिंदे यांनी शेतीमध्ये विविध आधुनिक प्रयोग राबवत उत्पादन वाढीसह शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या कार्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रेरित झाले आहेत.
शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर त्यांनी कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या पुरस्कारामुळे केवळ गणपतराव शिंदे यांचाच नव्हे,तर संपूर्ण परिसराचा आणि कृषी क्षेत्रात मेहनत घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा गौरव झाला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
विविध सामाजिक,शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून त्यांच्या पुढील कृषी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.“काळ्या आईची निष्ठेने सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान संपूर्ण ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे,”अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
