झाडांच्या फांद्यांमुळे पुन्हा तुटली उच्चदाब वीजवाहिनी; दोन विभागांच्या ढकलाढकलीत ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ
आश्वी संजय गायकवाड पावसाळा सुरू होताच संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात विजेच्या तारा तुटण्याच्या घटना पुन्हा समोर येत आहेत. नुकतेच सकाळी नऊ वाजता गायांसाठी चारा कापत असताना आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी रामनाथ क्षिरसागर (वय ४४) व त्यांच्या पत्नी सौ. योगिता क्षिरसागर (वय ३८) यांच्या अवघ्या दोन फुटांवर उच्चदाबाची वीज वाहिनीच्या तारा तुटून कोसळल्या.तारेला असलेल्या रबराच्या आवरणामुळे आणि दोघेही काही अंतरावर असल्याने मोठा अनर्थ टळला.क्षणभरात मृत्यू समोर उभा ठाकल्याचा थरारक अनुभव या दाम्पत्याने घेतला.
ही घटना जगुमाई–पाचमोऱ्या ओढा परिसरात,आश्वी माळेवाडी रस्ता असलेल्या प्रवरा उजव्या कालव्या लगत क्षिरसागर यांच्या शेतजमीनी लगत घडली.यावेळी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज,हवेत विजेच्या ठिणग्या आणि काही क्षण अंधारी येताच त्यांच्यासमोर मुख्य वीजवाहिनी जमिनीवर पडलेली दिसली.सुदैवाने तारेला रबराचे संरक्षण असल्याने मोठी जीवितहानी टळली.
विशेष म्हणजे,याच परिसरात नऊ वर्षांपूर्वी येथील शेतकरी रमेश लहानू शिंदे यांचा तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जुनी दुर्घटना पुन्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली आहे.
घटनेची माहिती रामनाथ क्षिरसागर यांनी तातडीने वीज वितरण कंपनीचे हर्षल गडगे गणेश गायकवाड तान्हाजी सांगळे यांच्याशी संपर्क साधून दिली असता ते घटनास्थळी दाखल होऊन झाडांच्या फांद्या तोडत वीजपुरवठा सुरळीत केला.मात्र मूळ प्रश्न आजही कायम आहे.आश्वी खुर्द उपकेंद्रातून हंगेवाडी व शेडगावकडे जाणाऱ्या शेतीच्या वीजवाहिन्या खाली मोठमोठी झाडे वाढली आहेत.वारा, पाऊस किंवा वादळ सुरू होताच फांद्या तारांवर पडून अशा घटना घडतात.या मार्गावरून दररोज शेतकरी,ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी ये-जा करतात.त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.वीज वितरण कंपनी झाडे पाटबंधारे विभागाची असल्याचे सांगते,तर पाटबंधारे विभाग वीज वितरण कंपनीची जबाबदारी असल्याचे सांगून हात झटकत आहे.दोन विभागांच्या या फिरवाफिरवीत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करणार आहेत.
प्रश्न कोण सोडवेल वीज महामंडळ की पाटबंधारे विभाग
"घटनेनंतर तातडीने वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला.मात्र झाडे पूर्णपणे हटविण्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी आवश्यक आहे."
अक्षय विखे अभियंता, वीज वितरण कंपनी आश्वी
-गरज पडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
"या झाडांबाबत अनेक वेळा मागणी करूनही दखल घेतली जात नाही. भविष्यात दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित दोन्ही विभागांवर राहील. गरज पडल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल."
— सतीश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, आश्वी खुर्द
मृत्यूंची मालिका निर्माण झाल्यावर प्रशासनाला जाग.
नऊ वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याचा बळी गेला... आता क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले... आणखी किती जीव धोक्यात घातल्यानंतर प्रशासन जागे होणार?
कैलास गायकवाड
सामाजिक कार्यकर्ते आश्वी खुर्द
