निरोगी समाज घडविण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद
संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील कनोलीत गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य चिकित्सा व आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.पूनम जगताप यांनी केले.कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा उज्वला जगताप,कनोली गावचे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र जगताप,नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वाजे तसेच डॉ.भूषण देसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मच्छिद्र जगताप यांनी सांगितले की,आरोग्य जपणे म्हणजे केवळ आजारांपासून दूर राहणे नव्हे,तर आपले शरीर, मन आणि पर्यावरणाबाबत योग्य माहिती मिळवून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे होय.
प्रत्येकाने चांगल्या सवयी स्वीकारून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प करावा,असे आवाहन यावेळी त्यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वाजे यांनी आरोग्य शिक्षणाचे महत्त्व विषद करताना सांगितले की आरोग्य शिक्षणामुळे व्यक्तीला चांगल्या व वाईट सवयीतील फरक समजतो.पौष्टिक आहार, स्वच्छता,नियमित व्यायाम,पुरेशी विश्रांती आणि तणाव व्यवस्थापन यामुळे अनेक आजार टाळता येतात.
मद्यपान,धूम्रपान व इतर व्यसनांपासून दूर राहणे, लसीकरण,स्वच्छ पाणी व स्वच्छतेच्या सवयी यांमुळे निरोगी समाजाची निर्मिती होते.निरोगी व्यक्ती म्हणजेच सुदृढ राष्ट्राचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ.भुषण देसले यांनी शरीराचे आरोग्य जपण्याचे महत्त्व सांगताना विशेषतः मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. किडनी शरीरातील अपायकारक व विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम करते.
शरीरातील पाण्याचे संतुलन,रक्तदाब आणि खनिजांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात तिची महत्त्वाची भूमिका असते.त्यामुळे प्रत्येकाने संतुलित आहार घ्यावा, फळे व भाज्यांचा आहारात समावेश करावा,तेलकट पदार्थ टाळावेत आणि नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान करावे,असे त्यांनी सांगितले.
या आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत गॉड्स असेंबल मिनिस्ट्रीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थेच्या सेवाभावी कार्यक्रमामुळे लोकांची आरोग्याबाबत जनजागृती होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
