सुपा,प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहत दिवसेंदिवस वेगाने वाढत प्रमाणावर उद्योग आणि कंपन्यांची गुंतवणूक येथे होत आहे.येथील सुपा फेज १/२ औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरणमध्ये कार्यरत असलेले बाळासाहेब तथा हरी थोरात यांनी आपल्या सेवेद्वारे याचे उत्तम उदाहरण घालून दिले.त्यानिमित्ताने त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
उद्योजक करोडोंची गुंतवणूक करून उद्योग उभा करतात, परंतु उन, वारा,पाऊस, रात्री-अपरात्री कोणत्याही वेळी फॉल्टमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तात्काळ सुरू करणे हे महावितरण कर्मचाऱ्यांचे महत्वाचे काम असते.
रात्री-अपरात्री कंपनीत वीजेची अडचण आल्यास फक्त प्लॉट नंबर सांगितला तरी थोरात यांनी तत्परतेने जाऊन समस्या सोडवून निष्ठेने कर्तव्य बजावले आहे.त्यांच्या या सेवेमुळे उद्योग व्यवस्थापनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला होता.
आता बदलीनिमित्त थोरात यांची या ठिकाणाहून बदली झाली.प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार आणि तालुका सचिव नारायण नरवडे यांच्या हस्ते थोरात यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महावितरणचे अभियंता श्री.पिसाळ जोडारी श्री.विटेकर,श्री.जरे,श्री. वेताळ तसेच महावितरणचे इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते.औद्योगिक विकासाच्या पाठीमागे अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे, हेच या सन्मानातून दिसून आले.
