संगमनेर,प्नतिनिधी केरळ राज्याचे महामहिम भूतपूर्व राज्यपाल,ज्येष्ठ आंबेडकरी नेते, संविधाननिष्ठ लोकप्रतिनिधी आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते स्मृतीशेष दादासाहेब तथा रा. सु. गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर विविध सामाजिक,शैक्षणिक व राजकीय संस्थांच्या वतीने त्यांना संगमनेर येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
रा.सु.गवई यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजघटकांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय कार्य केले. भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर प्रचार व प्रसार केला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले.
महाराष्ट्र विधान परिषद, राज्यसभा तसेच विविध घटनात्मक पदांवर कार्य करताना त्यांनी स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाची परंपरा जपली. सन २००८ ते २०११ या कालावधीत केरळ राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी अत्यंत संयम, अभ्यासू वृत्ती आणि संविधाननिष्ठ भूमिकेद्वारे आपल्या कार्याची अमिट छाप सोडली.
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जनसामान्यांशी असलेली आत्मीयता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही प्रेरणादायी मानले जातात.
त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
स्मृतीशेष दादासाहेब तथा रा. सु.गवई यांचे कार्य, विचार आणि लोकसेवेची परंपरा समाजाला सदैव प्रेरणा देत राहील.त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
