लोणी रुपाली भालेराव 'मातृदेवो भवःपितृदेवो भवः'हे सुभाषित आपण नेहमीच वाचनात आणतो आणि ऐकतो सुद्धा.परंतु,या सुभाषिताचे प्रत्यक्ष जीवनात किती पालन होते आणि आजच्या समाजात वृद्धांच्या वाट्याला येणाऱ्या यातना किती विदारक असतात,याची प्रचिती देणारी एक अत्यंत मनाला हेलावून टाकणारी घटना नुकतीच राहाता तालुक्यातील लोणी बसस्थानक परिसरात घडली आहे.
या घटनेने एकीकडे समाजातील निगरगट्ट वागणुकीवर प्रकाश टाकला,तर दुसरीकडे माणुसकीचा जिवंत झरा अद्यापही दिसून आलेला आहे याचे उत्तम उदाहरण समोर आणले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,लोणी बसस्थानक परिसरात सायंकाळी नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ सुरू असताना, तिथे एक अत्यंत वृद्ध दाम्पत्य आले होते.या वयोवृद्ध दांपत्याला अर्धांगवायूचा असल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय पूर्णपणे आखडले होते आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहणे किंवा चालणे अशक्य झाले होते.
वृद्ध दाम्पत्याच्या पोटात अन्नाचा एकही घास गेला नव्हता,त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.या शोकांतिकेत ते दोघेही बसस्थानक परिसरात अत्यंत दयनीय अवस्थेत विसावले होते.हे दृष्य वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांच्या निदर्शनाला आली.
त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने लोणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, लोणी पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल शिपणकर, पोलीस कॉन्स्टेबल सातपुते,होमगार्ड शेलार तसेच होमगार्ड मगर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत संवेदनशीलतेचे दर्शन घडवत त्या वृद्ध दाम्पत्याची आपुलकीने चौकशी केली आणि त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळवून दिले.तसेच अल्पोपहार देखील दिला.या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पत्रकार महेश भोसले आणि पत्रकार रूपाली भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
प्रसंगावधान राखत पत्रकारांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना संगमनेर जवळ असलेल्या खांडगाव येथील वृद्धाश्रमाचा दूरध्वनी क्रमांक दिला.लोणी पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी वृद्धाश्रमातील संयोजकांना संपर्क साधून त्यांना या वयोवृद्ध दांपत्यांना दाखल करून घेण्याकरिता सांगितले.
लोणी परिसरातील ग्रामपंचायतीच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली.या हृदयद्रावक प्रसंगी माणुसकीचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले, जिथे सर्वांनी मिळून एकाच वेळी मदतीचा हात पुढे केला.
लोणी बस स्थानकातील स्वच्छता कर्मचारी शुभम बेनवाल यांनी संकोच न बाळगता त्या वयोवृद्ध दांपत्याला स्वतःच्या हाताने उचलून गाडीमध्ये व्यवस्थित बसवले आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी अनाथ, असहाय आणि वृद्ध व्यक्ती उघड्यावर जीवन जगत असतात, परंतु त्यांच्याकडे सहसा कोणाचेही लक्ष जात नाही.
मात्र,लोणी बस स्थानकावर घडलेल्या या प्रसंगाने समाजमनात कृतज्ञतेचा संदेश दिसून आला आजच्या या धावपळीच्या युगात आणि आधुनिक समाजात प्रत्येकाने एकमेकांना जपणारा आणि मानणारा मानवी धर्म जोपासला पाहिजे.
आजच्या काळात प्रत्येकाने हा विचार करणे गरजेचे आहे की, ज्या आई-वडिलांनी आपल्या लहान मुलांना अत्यंत कष्टाने आणि प्रेमाने लहानाचे मोठे केले,त्याच आई-वडिलांवर म्हातारपणात अशी वेळ का येते? मुलांचे संस्कार कमी पडतात की आई-वडिलांना सांभाळण्यामागे मुलांचा कुठेतरी कमीपणा किंवा दुर्लक्ष होते,यावर प्रत्येक कुटुंबाने आणि समाजाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
