-देवळाली प्रवरा सोसायटी व शासनाला महाविकास आघाडीचा इशारा.!
-कर्ज माफीचे सहा कोटी परत गेले.? अन् देवळाली चे शेतकरी हवालदिल झाले..!
देवळाली प्रवरा प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील
देवळाली प्रवरा हद्दीतील शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम परत गेल्याच्या वार्ताने येथील शेतकरी हवालदिल झाले असून महाविकास आघाडीच्या सदस्यांनी देवळाली प्रवरा सोसायटीत जाऊन व्यवस्थापकाकडून माहिती घेतली असता सोसायटीची चूक नसल्याचे सांगून व्यवस्थापकाने हात झटकले.त्यामुळे झालेली तांत्रिक चूक सुधारून आठ दिवसात कर्जमाफीची परत गेलेली सहा कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा.. अन्यथा,महाविकास आघाडीच्या वतीने देवळाली प्रवरा सोसायटी व शासनाचे विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा डॉ.तनपूरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे,अरुण ढूस,देवळाली प्रवरा नगर परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते दासूभाऊ पठारे, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, माजी संचालक नानासाहेब कदम, दीपक पठारे,देवराम कडू आदी उपस्थितीत होते.
केवळ एका तांत्रिक चुकीमुळे देवळाली प्रवरा सोसायटीच्या कर्जदार सभासदांची कर्जमाफीची आलेली सहा कोटी रुपयांची रक्कम परत गेल्याचे समजल्याने झाल्या प्रकारची माहिती घेण्यासाठी देवळाली प्रवरा सोसायटीत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी नुकतेच सोसायटीत धाव घेऊन येथील शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचे सहा कोटी परत गेले असल्याची खात्री करून या प्रकाराला कोण जबाबदार आहे याची व्यवस्थापक श्री. चव्हाण यांच्याकडून माहिती घेतली असता झाल्या चुकीबद्दल आम्ही जबाबदार नसून वरूनच चूक झाल्याचे जुजबी उत्तर व्यवस्थापक कडून मिळाले.
तथापि देवळाली प्रवरा सोसायटी ज्यांच्या ताब्यात आहे त्यांचे गल्ली ते दिल्ली सरकार असताना देवळाली प्रवरा सोसायटीमध्ये आलेली कर्जमाफीची रक्कम परत गेल्याने हे कर्जमाफीची रक्कम आपल्याला परत मिळेल की नाही हा शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.तसेच तालुक्यात फक्त देवळाली सोसायटीचेच कर्जमाफीचे पैसे मागे का? गेले यावर देवळाली प्रवरेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
प्रसंगी या आठवड्यात जर ही तांत्रिक चूक दुरुस्त करून कर्जमाफीचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने देवळाली प्रवरा सोसायटी व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपस्थितांनी दिला.
