शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सरस्वती महिला गटाचा अनोखा पुढाकार

Cityline Media
0
स्वतःच्या शेतजमिनीत उभी केली ‘परसबाग’

लोणी  रुपाली भालेराव राहता तालुक्यातील असणारे निर्मळ पिंपरी या गावात मिळणार विषमुक्त,जैविक भाजीपाला मिळावा ,आहाराच्या बाबतीत संतुलित पोषण सोबत कुठलीही फवारणी न करता आहार मिळावा याकरिता शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांना चांगला,सकस आणि जैविक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला मिळावा,या सुंदर उद्देशाने पिंपरी निर्मळ येथील सरस्वती महिला शेतकरी गटाने आदर्शवत उपक्रम हाती घेतला आहे.गटाच्या अध्यक्षा सौ.मीना निर्मळ यांच्या पुढाकारातून महिलांनी आपल्या स्वतःच्या जागेत सुंदर अशी जैविक परसबाग उभी केली आहे.
कृषी विभाग,पानी फाउंडेशन व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ अंतर्गत शेतकरी कार्यशाळेच्या माध्यमातून या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.
शाळेतील मुलांसाठी ‘आपल्या मातीची भाजी’सरस्वती महिला शेतकरी गटातील महिला आपापले शेतीचे काम आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही एकत्र आल्या आणि त्यांनी ही परसबाग साकारली.

महिलांच्या जवळच असलेल्या कावडविहीर शाळेतील लहान विद्यार्थ्यांना ताजा,सकस आणि जैविक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला मिळावा,हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
शाळेत भाजीपाला लागवडीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने महिलांनी स्वतःच्या जागेचा वापर करून ही परसबाग उभी केली.

त्यामुळे मुलांसाठी पौष्टिक भाजीपाला उपलब्ध करून देण्याबरोबरच जैविक शेतीची सुंदर संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे.
 शेती करणाऱ्या महिलांनीच दिला जैविक शेतीचा संदेश हा या परसबागेचा उद्देश केवळ भाजीपाला उत्पादन करणे एवढाच नसून, लहान मुलांना जैविक शेती, विषमुक्त अन्न, सकस आहार आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावे,हा देखील आहे.

अध्यक्षा सौ.मीना निर्मळ यांनी विद्यार्थ्यांना जैविक पद्धतीने भाजीपाला पिकवण्याचे महत्त्व समजावून सांगितले.जैविक पद्धतीने तयार केलेले अन्न,मातीचे आरोग्य,पर्यावरणाचे संवर्धन आणि पुढील पिढीचे आरोग्य याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली.

“आज आपण मुलांना जे अन्न देतो,त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.त्यामुळे आपल्या शेतातून शक्य तितका सकस, नैसर्गिक आणि जैविक भाजीपाला मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
 
स्वतःची शेती, स्वतःची भाजी, आपल्या मुलांसाठी’परसबागेत विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करून महिलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही बाग फुलवली आहे. या परस बागेमध्ये शेपू, मेथी,काकडी,दोडका, टोमॅटो,मिरची पपई कोबी,फ्लॉवर आणि वाल अशा प्रकारचा भाजीपाला लावण्यात आलेला आहे.

स्वतःच्या जागेत, स्वतःच्या मेहनतीने आणि जैविक पद्धतीने तयार केलेली भाजी थेट विद्यार्थ्यांच्या ताटात पोहोचावी,ही या महिलांची संकल्पना आहे.जैविक शेतीमुळे मातीचे आरोग्य जपण्यास,पर्यावरणाचे संवर्धन करण्यास आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यास मदत होते.

त्यामुळे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ भाजीपाला मिळत नाही, तर त्यांना आपल्या मातीशी आणि शेतीशी जोडण्याचे कामही होत आहे. एका परसबागेतून मोठा संदेश यावेळी महिला शेतकरी गटातून देण्यात आला. 

सरस्वती महिला शेतकरी गटाच्या या उपक्रमातून ‘जैविक शेती म्हणजे आपल्या मातीचे, पर्यावरणाचे आणि पुढच्या पिढीच्या आरोग्याचे संवर्धन’,असा महत्त्वपूर्ण संदेश समाजासमोर आला आहे.

शेतात राबणाऱ्या महिलांनी केवळ उत्पादन घेण्यापुरते मर्यादित न राहता शाळकरी मुलांचे आरोग्य, पोषण, पर्यावरण आणि जैविक शेतीचा विचार करून उभी केलेली ही परसबाग पिंपरी निर्मळच्या महिला शक्तीचा आदर्श ठरत आहे.
सौ.मीना निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती महिला शेतकरी गटातील महिलांनी उभी केलेली ही हिरवीगार परसबाग म्हणजे केवळ भाजीपाल्याची बाग नाही, तर ‘मुलांच्या निरोगी भविष्यासाठी उगवलेली आशेची बाग’ आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!