श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील गोदाकाठच्या खानापूर शिवारात भामाठाण शिवरस्त्यावर नुकतेच रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुण शेतकऱ्यावर अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली.
या हल्ल्यात खानापूर येथील तरुण शेतकरी बापूसाहेब रायभान जगताप (वय ३५) हे जखमी झाले. मात्र,जीवावर बेतलेल्या या प्रसंगात न घाबरता जगताप यांनी प्रसंगावधान राखत रिकाम्या किटलीच्या सहाय्याने बिबट्याचा सामना केला.अखेर बिबट्याने तेथून धूम ठोकली.
बापूसाहेब जगताप हे मोटारसायकलवरून भामाठाण शिवरस्त्याने जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घेतली.बिबट्याच्या अचानक हल्ल्यामुळे जगताप खाली पडले आणि त्यानंतर त्यांची बिबट्यासोबत झटापट सुरू झाली.
या जीवघेण्या प्रसंगात जवळ असलेल्या रिकाम्या किटलीचा वापर करत त्यांनी बिबट्याचा सामना केला.जगताप यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बिबट्याने अखेर तेथून पळ काढला.मात्र,या झटापटीत त्यांच्या पायाच्या पोटरीवर जखम झाली.
घटनेच्या वेळी जगताप यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. त्यांच्या आवाजाने आजूबाजूच्या वस्तीवरील नागरिक व शेजारी तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यांनी जखमी बापूसाहेब जगताप यांना प्रथम माळवाडगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले.तेथून त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयामार्फत पुढील उपचारासाठी जगताप यांना अहिल्यानगर येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आल्याची माहिती रात्री उशिरा सुमारे १०.४५ वाजता मिळाली.
खानापूर-भामाठाण शिवारात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर खानापूर येथील जगताप वस्ती तसेच लगतच्या भामाठाण शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीच्या वेळी शेताकडे ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि शक्यतो एकट्याने शेतात जाणे टाळावे, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
खानापूर व भामाठाण ग्रामस्थांनी घटनेनंतर रात्रीच विविध ग्रुपवर संदेश प्रसारित करून परिसरातील शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
खानापूर-भामाठाण शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याचा शोध घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.जीवघेण्या प्रसंगी धीर न सोडता रिकाम्या किटलीच्या सहाय्याने बिबट्याचा सामना करणाऱ्या बापूसाहेब जगताप यांच्या धाडसाची खानापूर परिसरात चर्चा होत आहे.
